टिपा टिप्स!
भिंतीवर खिळा मारताना जर भिंत फुटत असेल तर खिळ्यावर राग काढण्याऐवजी हातोडीने सरळ भिंतीवरच ठोकावे. खिळा मारण्याचे श्रम वाचतात आणि रागही निवळतो.
निळ्या शाईचा डाग पांढऱ्या कपडय़ावर पडल्यास, त्याच्याच बाजूला लाल शाईचा डाग पाडावा. कोणता डाग अगोदर पुसला जाईल याची चाचणी घ्यावी. वेळ मजेत जातो.
घरातील बाथरूमच्या जाळीतून उग्र दर्प येत असल्यास, घराबाहेर पडून रस्त्यालगतच्या एखाद्या गटाराला भेट द्यावी. घरातल्या वासाचा त्रास सहन करण्याची शक्ती वाढते.
वजन कमी करण्यासाठी घरातच जोरजोरात उडय़ा माराव्यात. साहजिकच खालच्या मजल्यावरील रहिवासी भांडायला येतात आणि त्यात प्रचंड कॅलरीज खर्च होतात.
रस्त्यातून चालताना एक चप्पल तुटली तर दुसऱ्या पायातली चप्पलही तशीच तोडावी, फॅशन बनते.
पांढऱ्या केसांवर उत्तम उपाय म्हणजे काळा गॉगल लावून आरशात पाहावे.
चौकात वाहतूक पोलीस दिसला नाही तरी गाडी शिस्तीत सिग्नलला थांबवावी. तो खात्रीने पुढच्या आडोशाला लपलेला असतो.
तोंडाला दारूचा वास येत असल्यास साधा उपाय म्हणजे तोंड बंद ठेवावे.
वरण-भात जास्त झाल्यास तो आघाडीच्या नटय़ांपर्यंत पोहोचवण्याची सोय करावी. या सर्व नटय़ांची वरण-भात ही आवडती डिश असते.
वारंवार वीजप्रवाह खंडित होत असल्यास, वीज मंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधू नये. तेथील अधिकारीही अंधारात असू शकतात.
दाढदुखी थांबविण्यासाठी स्वत:च्या कानाखाली जोरात मारून घ्यावे. गाल बधिर होऊन दाढेचे दुखणे सुसह्य़ होते.
ताजी टीप : वरील उपाय स्वत:च्या जोखमीवर करून पाहावेत.
राज चिंचणकर, माहीम, मुंबई.
No comments:
Post a Comment