Monday, August 10, 2009

‘राखी सावंत खरेच इलेशशी विवाह करील काय आणि केला तरी तो टिकेल काय?’

बादशहा बिरबलाची वाटच पाहात होता. गेले तीन दिवस बिरबल बाहेर गेला होता आणि बादशहा एका नाजूक संकटात सापडला होता. रात्री तो बेगमच्या सहवासात गेला की, बेगम त्याला प्रश्न विचारीत असे, ‘राखी सावंत खरेच इलेशशी विवाह करील काय आणि केला तरी तो टिकेल काय?’ धाकटय़ा बेगमच्या या प्रश्नाला कंटाळून तो मोठय़ा बेगमकडे गेला तर तिनेही तेच प्रश्न विचारून त्याला भंडावून सोडले. बादशहाने मंत्रिमंडळात हे दोन प्रश्न विचारले, तर तिथेही कोणाला त्याची उत्तरे ठाऊक नव्हती. मग बादशहाने राजज्योतिषाला बोलावून त्यालाही विचारले तर तोही म्हणाला, ‘याची उत्तरे देण्यास ज्योतिषशास्त्र असमर्थ आहेत’. बिरबल बाहेरगावी गेला होता. त्याला आल्या-आल्या बादशहाचा निरोप मिळाला आणि तो तातडीने हजर झाला. बादशहाचा प्रश्न ऐकून बिरबल खो खो हसू लागला. बादशहा म्हणाला, ‘अरे, गेल्या तीन रात्री मी झोपू शकलेलो नाही. दोन्ही बेगमना या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत, आणि तू हसतो आहेस?’ त्यावर बिरबल म्हणाला, ‘अहो, नको त्या प्रश्नांसाठी आपली शक्ती कशाला खर्च करता?’ बादशहा म्हणाला, ‘बेगम कशा आहेत ते तुला ठाऊक आहेत ना?’ हसत हसत बिरबल म्हणाला, ‘खाविंद, मोठय़ा बेगमशी तुमचा निकाह लागला ती तारीख होती १७ ऑगस्ट आणि धाकटय़ा बेगमशी तुमचा निकाह झाला १९ ऑगस्ट रोजी. बरोबर?’ मान हलवित बादशहा म्हणाला, ‘अगदी बरोब्बर! पण याचा इथं काय संबंध?’ बिरबल म्हणाला, ‘आता मी काय सांगतो, ते ऐका’ आणि त्यानं बादशहाला कानमंत्र दिला. रात्री बादशहा मोठय़ा बेगमच्या दालनात भोजनासाठी गेला, तेव्हा तिनं अपेक्षेप्रमाणं पुन्हा रात्री इलेशबाबत प्रश्न विचारला. बादशहा म्हणाला, ‘मी एका मोठय़ा ज्योतिषाशी बोललो. तो म्हणाला की, हे लग्न जर १७ ऑगस्टला झालं तर टिकणार नाही, त्या दिवशी लागलेली लग्नं सहसा टिकत नसतात!’ मोठी बेगम गप्प झाली. रात्री झोपायला तो धाकटय़ा बेगमच्या शयन कक्षात गेला. तिथेही तो प्रश्न आला, तेव्हा बादशहाने पुन्हा तेच उत्तर दिले. फक्त १७ ऑगस्टऐवजी १९ ऑगस्ट म्हणाला. धाकटी बेगमही मग काही बोलली नाही. बादशहा शांत झोपला.
सकाळी चहाच्या वेळी दोन्ही बेगम बादशहाच्या सोबत बसल्या. शाही तबकात चहाचे चार नक्षीदार कप पाहून बादशहा म्हणाला, ‘हा चौथा कप कोणासाठी?’ दोन्ही बेगम एका स्वरात म्हणाल्या, ‘बिरबल भाऊजी आलेत ना परत राजधानीत..
त्यांच्यासाठी!’ बादशहा मस्त हसला!

No comments: